औरंगाबाद / प्रतिनिधी

  कोरोना संसर्गापासून बचावासाठी राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद ठेवत ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू केली आहे. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फ ोन असणे अत्यंत गरजेचे आहे. औरंगाबाद महापालिका शाळेत शिकणारी काही मुले ही अत्यंत गरीब कुटूंबातील असतात. अशा तब्बल 60 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फ ोन्स नसल्याने केवळ 40 टक्केच विद्यार्थ्यांना पालिकेच्या डिजिटल शिक्षणाला लाभ मिळत आहे. उर्वरीत विद्यार्थ्यांनी यंदा शिकायचे कसे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याही स्थितीत स्मार्ट फ ोन नसणार्‍यांना त्यांच्या साध्या मोबाइलवर संपर्क करून शिक्षणाविषयी शिक्षकांकडून मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी आदर्श गावकरीला दिली.

  औरंगाबाद शहरात महापालिकेच्या एकूण 72 शाळा आहेत. या शाळांत सुमारे 17 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. यंदा कोरोनामुळे त्यातल्या त्यात औरंगाबाद शहर रेडझोनमध्ये असल्याने येथील शाळा, महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने शासन निर्देशानुसार डिलिटल अर्थातच ऑनलाइन शिक्षणाला प्रारंभ केला आहे. याबाबत शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, इयत्ता तिसरी ते आठवी पर्यंतच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांतून डिजिटल शिक्षण पालिकेकडून दिले जात आहे. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही नियोजन केले आहे. पालिकेतील सर्व मराठी माध्यमाच्या वर्गशिक्षकांचे व्हाट्सअप्प ग्रुप तयार केले आहे. पालिकेतील 41 तंत्रस्नेही शिक्षकांनी वर्गनिहाय ग्रुप तयार केले असून त्यात वर्गानुसार व्हिडिओ दररोज न चुकता शेअर केले जातात. त्यानंतर सर्व वर्गशिक्षक त्यांनी तयार केलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर ते शेअर करतात. त्यामुळे सर्व पालिका शाळांत शिक्षण घेत असलेल्या व साधारणपणे ज्यांच्याकडे अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल आहे असे 40 विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत. यामुळे मुलांचे शिक्षण सुलभ झालें आहे, असा दावा शिक्षणाधिकार्‍यांनी केला. या ऑनलाइन शिक्षणासाठी पालिका शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी व सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत उबाळे व तुषार ताठे हे शिक्षक परिश्रम घेत आहेत.

विषयनिहाय व्हिडिओची निर्मिती.......

पालिका शाळांमधील 41 शिक्षक विविध विषयांचे व्हिडिओ नियोजनाप्रमाणे रोज तयार करत आहेत. शिक्षक दररोज ठरवून दिलेल्या नियोजनाप्रमाणे हे व्हिडिओ विषयनिहाय वर्ग शिक्षकांच्या ग्रुपवर टाकत आहेत. पालिका शाळांमधील साधारणतः 300 वर्गशिक्षक हे व्हिडिओ आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर दररोज पोस्ट करत आहे. यामुळे या शैक्षणिक व्हिडिओचा जवळपास 5000 ते 6000 विद्यार्थ्यांना दररोज शिक्षणासाठी फ ायदा होत आहे. अशाच प्रकारचे नियोजन पालिकेतील उर्दू माध्यमाच्या शाळेतही सुरू आहे.

साध्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज....

स्मार्ट ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल नाहीत, असे 60 टक्के विद्यार्थी आहेत. त्यांना शिक्षकांद्वारे साधा टेक्स्ट मेसेज पाठविला जातो. विद्यार्थी मोबाइलवर शंका विचारतात. त्यानुसार त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. तथापि, 15 टक्के विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्याकडे साधा मोबाइल देखील नाही. अशा विद्यार्थ्यांपर्यंत पालिकेचे ऑनलाइन शिक्षण अद्याप पोहचले नसल्याची कबुली शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.

दिवाळीनंतर अतिरिक्त शिकवणीचे नियोजन...

पालिकेच्या डिजिटल शिक्षणाचा लाभ 40 टक्के विद्यार्थ्यांना थेट होत आहेत. मात्र 60 टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन्स नाहीत, अशांशी साध्या मोबाइलवर संपर्क करून व टेक्स्ट मेसेजद्वारे त्यांना शिक्षण दिले जात आहे. तथापि, ज्यांच्याकडे साधा मोबाइलही नाही, अशांसाठी दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यास अतिरिक्त शिकवणी वर्ग घेण्याचे नियोजन केले जात आहे.
   - श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, मनपा.