नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारचा दिल्ली पोलिस एका मृत्यू प्रकरणात शोध घेत आहेत. दिल्लीतील मॉडल टाऊन भागातील छत्रसाल स्टेडियमवर पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यामध्ये पाच 
पैलवानांना गंभीर दुखापत झाली होती. त्यातील सागर नावाच्या 23 वर्षीय पैलवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दाखल आरोपपत्रात पैलवान सुशील कुमारचेही नाव असल्याची माहिती समोर येत आहे. 

प्रत्यक्षदर्शीच्या जबाबानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन तपास सुरु केला आहे. पैलवान सुशील कुमार, अजय, सोनू, सागर, प्रिन्स आणि अमित यांच्यासह अनेकांमध्ये हाणामारी झाली होती. एफआयआरमध्ये सुशील कुमारचेही नाव असल्याने त्याच्यासह बाकी आरोपींचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेत. सुशील कुमार सापडल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मयत पैलवान सागर हा आपल्या मित्रांसोबत छत्रसाल स्टेडियमजवळील मॉडल टाऊन परिसरातील एका घरात राहत होता. मालमत्तेवरुन मंगळवारी मध्यरात्री दोन गटांत तुफान हाणामारी आणि गोळीबार झाला. जखमी पैलवानांपैकी सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर जखमी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्कॉर्पिओ कार आणि बंदूक मिळाली. तसेच, पोलिसांनी जिवंत काडतुसेही जप्त केली. 

काय म्हणाला सुशील कुमार ?
ते आमचे पैलवान नव्हते, मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. आम्ही पोलिस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे की काही अनोळखी व्यक्तींनी आमच्या आवारात उडी मारुन भांडण केले. आमच्या स्टेडियमचा या घटनेशी काही संबंध नाही, असा दावा कुस्तीपटू सुशील कुमारने बुधवारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला होता.