नवी दिल्ली : आयपीएलच्या रणसंग्रमात आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात सामना रंगणार आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी 2 सामने जिंकले देखील आहे. गुणतालिकेत दिल्ली तिसर्‍या, तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे, आज  हे दोन्ही संघ विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी झगडणार आहे.
मुंबई संघात सूर्यकुमार यादव, ईशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ क्रुणाल असे धडाकेबाज खेळाडू आहे. जे कोणत्याही संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करण्यास सक्षम आहे. मात्र, त्यांना अद्याप चमकदार कामगिरी करता आलेली नाही. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट डेथ ओवरमध्ये मुंबईला विजय मिळवून देत आहे. त्यांच्याखेरीज राहुल चहर फिरकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सर्वांच्या योगदानामुळे मुंबईने क्रमश: 150 आणि 152 धावांचा बचाव केला होता.
तर दुसरीकडे, दिल्लीसाठी सर्वात सकारात्मक बाब म्हणजे शिखर धवनचा फॉर्मात आहे. तो आतापर्यंतच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा (186 धावा) फलंदाज आहे. रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीने स्टीव्ह स्मिथला संधी दिली, पण चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेला पुन्हा संधी मिळू शकते. दिल्लीकडे मार्कस स्टॉइनिस आणि ललित यादव यांच्यासारखे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. हे खेळाडूही आपली भूमिका बजावण्यास उत्सुक असतील. दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा आणि ख्रिस वोक्स हे दिल्लीच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करतील. नॉर्कियाही त्यांच्यासाठी अतिरिक्त पर्याय आहे.

संभाव्य प्लेईंग 11

दिल्लीची कॅपिटल्स  :  शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्हन स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, ललित यादव, ख्रिस वोक्स, आर. अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा.

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डि कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, राहुल चहर, अ‍ॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट.