मुंबई : कोरोना महामारीच्या संकंटानंतर लवकरच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकरच घोषणा होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये म्हणजेच कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिलेक्शन कमिटीचे चेअरमन सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत भारतीय संघातील खेळाडूंची निवड होणार आहे. या समितीसमोर कसोटी मालिकेसाठी पाचवा जलदगती गोलंदाज निवडणे डोकेदुखी ठरणार आहे.
आयपीएलदरम्यान भारतीय संघाचे दोन प्रमुख जलदगती गोलंदाज जखमी झाले आहेत. यात . भुवनेश्वर कुमारला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली आहे. तर इशांत शर्माला स्टाईड स्ट्रेन झाली आहे. त्यामुळे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समितीसमोर पाचवा जलदगती गोलंदाज निवडणे डोकेदुखी ठरत आहे. सध्दा भारताकडे मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव हे तीन मुख्य पेसर्स (जलदगती गोलंदाज) आहेत. नवदीप सैनी भारताचा चौथा जलदगती गोलंदाज असेल. समितीसाठी पाचवा गोलंदाज म्हणून कोणाची निवड करणार हे महत्वाचे ठरणार आहे. पाचव्या जलदगती गोलंदाजाची जागा मिळवण्यासाठी हैदराबादचा मोहम्मद सिराज आणि मुंबईचा शार्दुल ठाकूर हे दोघे रेसमध्ये आहेत. सिराजने इंडिया ए आणि रणजी ट्रॉफीच्या मोठ्या फॉरमॅटमधील सामन्यांमंध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला शार्दुलकडे नवा चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.