मेलबर्न - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर रोहित शर्माही क्वारंटाइन कालावधी संपवून 30 डिसेंबरला संघात खेळण्यासाठी मेलबर्नमध्ये दाखल झालाय.  त्यानंतर उर्वरित 2 सामन्यांसाठी त्याला संघाचा उपकर्णधार करण्यात आले. परंतु आता एका महत्त्वाच्या कारणामुळे रोहित शर्मासह टीम इंडियातील 5 क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवले आहे.

मेलबर्नमध्ये एका हॉटेलामध्ये या 5 खेळाडूंनी जेवण केले. त्यानंतर एका चाहत्याने त्यांचे बिल भरले. चाहत्याने खेळाडूंकडून पैसे घेण्यास नकार दिल्यानंतर या खेळाडूंनी त्याच्यासोबत सेल्फी काढला आणि त्या जोडीला धन्यवाद दिले. घडलेला प्रकार आणि व्हिडीओ त्या चाहत्याने टि्वट केला. या सर्व खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्याचेही चाहत्याने स्पष्ट केले. पण बायो-बबलचे उल्लंघन केल्याचा संशय असल्याने रोहित शर्मा, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि शुबमन गिल या 5 खेळाडूंना पुन्हा एकदा विलगीकरणात ठेवले आहे. 

भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ जिथे वास्तव्यास आहे, तेथून या 5 जणांना वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास ठेवले आहे. कोरोना संदर्भातील नियमावली लक्षात घेऊन इतर भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या सुरक्षेसाठी या खेळाडूंना विलगीकरणात ठेवले आहे. या 5 खेळाडूंना सामन्यासाठी सराव करण्याची मुभा दिल्याची माहिती ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने दिली.

मेलबर्नमध्ये पंतने चाहत्याला मिठी मारल्याची आधी बातमी मिळाली होती. पण नंतर त्या चाहत्याने असे काही घडले नाही, असे स्पष्टीकरण दिले होते. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून या घडलेल्या प्रकाराबाबत बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तपास करत आहेत. या प्रकरणात कोरोना संदर्भातील कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले आहे का? याचा तपास केला जात आहे.