मुंबई : चेन्नईने आयपीएल 2021चे जेतेपद पटकावून चौथ्यांदा करंडक उंचावण्याचा मान मिळवलेला आहे. जेवढी चर्चा चेन्नईने फायनल मारल्याची झाली तेवढीच चर्चा किंबहुना त्यापेक्षा अधिक चर्चा धोनी पुढचा आयपीएल हंगाम खेळणार की नाही?, याची झालेली आहे. पण आता चेन्नई आणि माही फॅन्सना मोठा दिलासा मिळाला आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार, चेन्नई सुपर किंग्ज एम एस धोनीला रिटेन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्ज आपले पहिले रिटेन्शन कार्ड फक्त महेंद्रसिंग धोनीसाठी वापरणार आहेत, अशी माहिती सीएसकेच्या मॅनेजमेंटने दिलेली आहे. याआधी धोनीने आयपीएल 2021 चे विजेतेपद पटकावल्यानंतर हर्षा भोगलेशी केलेल्या संभाषणात आयपीएल 2022 मध्ये खेळण्याबाबत संकेत दिले होते. हर्षाने वारसा हा शब्द मुद्दाम वापरुन धोनीच्या निवृत्तीविषयी प्रश्न विचारला. मात्र सध्या असे काही करणार नाही, असे म्हणत धोनीने 2022 मध्ये खेळण्याबाबत संकेत दिले आहे.