मुंबई :  वाढत्या कोरोनामुळे आयपीएल संकटात सापडण्याची शक्यता आहे.  आयपीएल स्पर्धेमधून अनेक खेळाडूंनी माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशांची दारे काही काळासाठी भारतीय विमानांवरील बंदीमुळे बंद होत आहेत. परिणामी काही ऑस्ट्रेलियन, इंग्लंडचे खेळाडू आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतत आहेत. त्यातच आता अंपायर्सचीही भर पडत आहे. भारताचे टॉपचे अंपायर नितीन मेनन आणि ऑस्ट्रेलियाचे पॉल रेफेल यांनी वैयक्तीक कारणांमुळे आयपीएला रामराम ठोकला आहे.
अंपायर नितीन मेनन हे मूळचे मध्य प्रदेशातील इंदोरचे आहेत. त्यांची पत्नी आणि आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे.  नितीन मेनन हे आयसीसीची एलिट पॅनेल अंपायरमधील एकमेव भारतीय अंपायर आहेत. नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड मालिकेत केलेल्या अंपायरिंगबद्दल त्यांना गौरवण्यातही आले होते. 

बीसीसीआयचे स्पष्टीकरण : नितीन यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे स्पर्धेत राहण्याची त्यांची मानसिकता नाही,असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.  दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकारने वाढत्या कोरोनामुळे भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. त्यामुळे अंपायर पॉल रेफेल यांनीही काढता पाय घेतला.