(संग्रहित छायाचिञ)

शारजा : राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज संजू सॅमसन चांगला फॉर्मात असताना संघात एक धडाकेबाज फलंदाज जोस बटलर दाखल झाल्याने राजस्थान रॉयल्स संघ आणखी मजबूत झाला आहे. त्यामुळे, आज रविवारी सायं. ७:३० वा. होणाऱ्या किं ग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात चाहत्यांना जोरदार षटकारांचा पाऊस बघायला मिळणार आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीयल रंगले आहे. युएईमध्ये उशिराने दाखल झालेल्या बटलरला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विलगीकरणाच्या नियमामुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागले. मात्र, आज रविवारी यशस्वी जैस्वालच्या साथीने बटलर डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमवारीत स्टीव्ह स्मिथ त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकेल. युवा सॅमसनने चेन्नईच्या गोलंदाजांची लय बिघडवताना ३२ चेंडूंत वेगवान ७४ धावा केल्या. मग अखेरच्या षटकात आर्चरने चार षटकारांची लयलूट केली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात पंजाबने मिळवलेल्या ९७ धावांच्या दमदार विजयात के. एल. राहुलचे आघाडीवरील नेतृत्व महत्त्वाचे ठरले. या सामन्यात त्याने सात षटकारांची आतषबाजी करीत ६९ चेंडूंत नाबाद १३२ धावा केल्या.