कोच्ची - भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केलेल्या क्रिकेटपटू एम सुरेश कुमार यांनी आत्महत्या केली आहे. सुरेश कुमार यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम सुरेश कुमार यांचा मृतदेह त्यांच्या खोलीत आढळून आला. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी त्यांची पत्नी आणि मुलगा घरी आले तेव्हा ते खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

सुरेश कुमार यांनी 1990 साली अंडर-19 च्या संघातून केरळचे प्रतिनिधीत्व केले होते. केरळमधून अंडर-19 च्या टीममध्ये खेळणारे ते पहिले खेळाडू ठरले होते. स्पिनर सुरेश कुमार यांनी 1990 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. त्यावेळी राहूल द्रविड अंडर-19 च्या संघाचा कर्णधार होता. त्यावेळी कुमार हे आताचे आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचे प्रशिक्षक आणि न्यूझीलंड संघाचे माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंग आणि गोलंदाज डियोन नॅशच्या विरोधात मैदानात उतरले होते. एम सुरेश कुमार हे एक अष्ठपैलू खेळाडू होते, त्यांनी रणजी ट्रॉफीत केरळचे प्रतिनिधित्व केले होते.