दुबई : आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्स नमवत मोठा विजच मिळवला. पंजाब संघाने काल विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. या विजयासह पंजाबने ८ गुण मिळवत पाचव्या स्थानी झेप मोठी झेप घेतली आहे.


आयपीएलमधील गुणतालिकेत पहिल्यास्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयी घोडदौड पंजाबच्या संघाने काल रोखली. दिल्ली कॅपिटल्सने शिखर धवनच्या दमदार शतकाच्या जोरावर १६४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबने निकोलस पूरनच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर ५ गडी आणि ६ चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे पंजाबच्या संघाने ८ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली.


दिल्ली कॅपिटल्सच्या १६४ धावांचा पाठलाग करताना पजांबची सुरूवात निराशाजनक झाली. पजांबचे तिन्ही धुवाधार फंलदाज लवकर बाद झाले. लोकेश राहुल ५ धावांवर तर मयंक अग्रवाल १५ धावांवर माघारी परतला. ख्रिस गेलने तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर चोप देत संघाला गती मिळवून दिली. तो २९ धावांवर माघारी परतल्यानंतर निकोलस पूरनने फटकेबाजीची जबाबदारी सांभाळली. पूरनने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २८ चेंडूत ५३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने त्याला उत्तम साथ देत ३२ धावांची खेळी केली. त्यानंतर जिमी निशम आणि दीपक हुडा जोडीने संघाला विजय मिळवून दिला.
दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉचा बळी लवकर गमावला. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत दोघांनाही चांगली सुरूवात मिळाली पण त्यांना मोठी धावसंख्या करता आली नाही. दोघेही वैयक्तिक १४ धावांवर माघारी परतले. मार्कस स्टॉयनीस ९ धावांवर तर शिमरॉन हेटमायरदेखील १० धावांवर बाद झाला. पण शिखर धवनने एक बाजू लावून धरली आणि अप्रतिम शतक झळकावले. धवनचे आयपीलमधील हे दुसरे शतक ठरले.