अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या १३व्या हंगामात आज सांयकाळी ७.३० वाजता चेन्नई आणि हैदराबाद संघ भिडणार आहे. चेन्नईला मागिल दोन सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे, चेन्नईला आज विजयाची आपेक्षा आहे. यातच चेन्नईचा धडाकेबाज फंलदाज अंबाती रायुडूचे पुनरागमन होणार आहे.


रायुडू चेन्नईच्या ‘आयपीएल’मधील पहिल्या विजयाचा शिल्पकार होता. परंतु मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे त्याला दोन सामन्यांना मुकावे लागले. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये दुखापत झाल्यामुळे ड्वेन ब्राव्हो अखेरच्या दोन सामन्यांत गोलंदाजी करू शकला नव्हता. परंतु ‘आयपीएल’मध्येही तो अद्याप खेळू शकलेला नाही. पण हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रायुडू आणि ब्राव्हो दोघेही खेळणार आहेत.
रायुडू परतल्यास तो शेन वॉटसनसह सलामीला उतरेल, तर धावांसाठी झगडणाऱ्या मुरली विजयला विश्रांती देण्यात येईल. परंतु ब्राव्होला स्थान देताना कर्णधार महेंद्रसिंह धोनीला अपेक्षेनुसार कामगिरी करू न शकणाऱ्या केदार जाधवच्या जागेचा विचार करता येऊ शकतो. ब्राव्हो नसताना चेन्नईकडून सॅम करनने पहिल्या तीन सामन्यांत लक्षवेधी कामगिरी केली आहे. वेगवान मारा आणि दिमाखदार फटके बाजी ही वैशिष्टय़े जोपासणाऱ्या करनची संघाला आवश्यकता आहे. .
‘आयपीएल’मध्ये चेन्नई आणि हैदराबादचे संघ हे सर्वात समतोल संघ म्हणून ओळखले जातात. परंतु दोन्ही संघांना यंदा विजयाचे सातत्य राखण्यात अपयश आले आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंतच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने गमावले आहेत. दोन्ही संघांना मधल्या फळीची चिंता भेडसावते आहे.