(संग्रहित छायाचिञ)
अहमदाबाद :
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच टी -20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर एक-एक सामना दोन्ही संघानी जिंकला आहे. पहिला सामना इंग्लंडने, तर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना अहमदाबाद येथील मोटेराच्या नव्याने बनवलेल्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची परवानगी दिली जाणार नाही.  तिसरा सामना जिंकून मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.

रोहितला संधी ? : पहिल्या टी -20 मध्ये नाणेफेक झाल्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. तेव्हा त्यात रोहित शर्मा वगळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर विराटने स्पष्ट केले की, पहिल्या दोन सामन्यांसाठी रोहितला विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत के. एल. राहुलसह शिखर धवन सलामीला आला आणि दोन्ही फलंदाजांनी तमाम भारतीयांची निराशा केली. धवनला याचा फटका बसला. त्यामुळे दुसर्‍या टी-20 मध्ये त्याला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी युवा फलंदाज इशान किशनला संधी देण्यात आली. किशनने या संधीचे सोने करत पाहुण्यांना चांगलांच चोप दिला. पदार्पणाच्या सामन्यात त्याने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत भारताला दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून दिला. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याची निवड पक्की झाली. तर दुसऱ्या टी-20 सामन्यात के. एल. राहुल पुन्हा एकदा अपयशी ठरला. राहुल पहिल्या सामन्यात एक धाव करुन बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे तिसऱ्या टी-20 सामन्यात राहुलला वगळून हिटमॅन रोहित शर्माला संधी दिली जाऊ शकते.

पाहुणे संघात बदल करणार का? : इंग्लंडचा संघ दुसऱ्या सामन्यात फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकला नाही. शिवाय, त्यांचे गोलंदाजही दुसऱ्या टी-२० सामन्यात अपयशी ठरले आहे. सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी धावांवर लगाम घातला. मात्र, त्यांना जास्त बळी घेण्यात अपयश आले. दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या संघातील वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनच्या २.५ षटकात ३८ धावा कुटल्या. त्यामुळे कर्णधार इयान मॉर्गन संघात कोणता बदल करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे पुन्हा दमदार कामगिरी करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न पाहुण्या संघाचा असेल. तर विराटसेना मालिका विजय सुखकर करण्याच्या दृष्टीने हा सामना खिशात घालण्याच्या उद्देशानेच मैदानावर उतरेल.

खेळपट्टी : तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करले, असे वातावरण आहे. आतापर्यंत मालिकेत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या सामन्यात चित्र पालटू शकते. खेळपट्टीवर लाल माती असल्याने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेणे, हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

संभाव्य संघ
भारत : इशान किशन, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार.

इंग्लंड : जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, इयान मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम करन, आदिल रशिद, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन आणि टॉम करन.

सामन्याची वेळ : सायंकाळी सात वाजल्यापासून, स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर