(संग्रहित छायाचिञ)
पुणे :
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी पुण्यातील गहुंजे मैदानावर रंगणार आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकावाच लागेल. तिसऱ्या वन डेमध्ये प्लेइंग 11 काय असेल, अशी चर्चा आता चाहत्यामंध्ये सुरू आहे. तिसऱ्या सामन्यात टीममधून कुणाल पांड्याआणि कुलदीप यादव यांना बाहेर बसवण्याची शक्यता आहे.

कुणाल आणि कुलदीप यांचा खराब परफॉर्मन्स : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाच्या बॉलर्सची खराब बॉलिंग पहायला मिळाली. हीच खराब कामगीरी भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिला होता. माञ, बॉलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि कुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. कुणालने ६ ओव्हरमध्ये तब्बल ७२ धावा दिल्या.  १२  हा त्याचा इकोनॉमी रेट होता. ७२ धावांच्या बदल्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. तर, दुसरीकडे कुलदीपनेही तोच कित्ता गिरवला. कुलदीपने १०  ओव्हर्समध्ये ८४ रन्स दिले. त्यालाही ८४  धावांच्या मोबदल्यात एकही विकेट्स मिळवता आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी कुलदीपला जोरदार लक्ष्य केले.  त्याच्या बॉलिंगवर एकूण आठ षटकार इंग्लिश फलंदाजांनी खेचले. हे एकदिवसीय सामन्यातील कोणत्याही भारतीय गोलंदाजाला मारलेले सर्वांत जास्त षटकार आहे. 

कुणाला पुन्हा संधी मिळणार? : कुलदीप यादव आणि कुणाल पंड्या यांच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. माञ, युजवेंद्र चहल सध्या फॉर्ममध्ये नसला तरी कर्णधार कोहलीकडे दुसरा कोणताही पर्याय अद्यापतरी नाही. 

टी नटराजनला संधी? : कुणाल पांड्या बॅटिंगच्या जोरावर टीममध्ये संघात जागा टिकवू शकतो. परंतु त्याचा बॉलिंग परफॉर्मन्स त्याला मारक ठरणार आहे. भारताचे प्रमुख अस्त्र भुवनेश्वरबरोबर यॉर्कर किंग टी नटराजनला संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शार्दुल ठाकूर सध्या फॉर्ममध्ये आहे, परंतु त्याला जर आराम दिला तर मोहम्मद सिराजचाही समावेश होण्याची अधिक शक्यता आहे.