मुंबई - गूगल सर्चमध्ये अविवाहित राशिद खानचे नाव टाकताच अनुष्का शर्मा त्याची बायको असल्याचे दाखवले जात आहे. यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे. Rashid Khan Wife असे गूगलवर सर्च केल्यास त्याच्या पत्नीचे नाव अनुष्का शर्मा असे उत्तर गूगलकडून मिळत आहे.

यामुळे मुळचा अफगाणिस्तानचा असणारा आणि सध्या आयपीएल-2020 हंगामात हैदराबादच्या संघाकडून खेळाणारा राशिद खान बराच चर्चेत आला आहे. अनेकजण सध्या गूगलसर्च मध्ये त्याचेच नाव सर्च करून पाहत आहेत.

राशिदची पत्नी कोण असे गूगलला विचारले असता, सर्च बारमध्ये तो अनुष्का शर्मा, असे दाखवतो. अनुष्का शर्मा म्हणजेच विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री. त्याखाली राशिद खानच्या कादकिर्दीचीदेखील माहिती देण्यात आली आहे.

असे सर्च केल्यास गूगलकडून मिळते अशी माहिती...

गूगलकडून अशी चूक का झाली असावी, या प्रश्नाचे उत्तर देताना तज्ज्ञ सांगतात. राशिद खानला 2018 मध्ये एका इन्स्टाग्राम चॅट मुलाखतीत त्याच्या आवडत्या अभिनेत्री बद्दल विचारणा झाली होती. त्यावेळी त्याने अनुष्का शर्मा हिचे नाव घेतले होते. त्यावेळी राशिद हे उत्तर चर्चेत राहिले होते. त्यामुळेच गूगलकडून अशी चूक झाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 11 डिसेंबर 2017 ला इटलीमध्ये लग्नगाठ बांधली. सध्या अनुष्का प्रेग्नेंट असून ती विराटसोबत युएईमध्ये आयपीएलचा आनंद घेत आहे.