नवी दिल्ली : कोरोनामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १४वा हंगाम  पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय या लीगच्या उर्वरित सामन्यांबाबत आशादायी आहे. मात्र, आता या उर्वरित सामन्यांत इंग्लंडचे खेळाडू खेळणार नाही आहे, अशी प्रतिक्रिया इंग्लंड क्रिकेटचे संचालक एश्ले जाइल्स यांनी दिली आहे. इंग्लिश बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनुकूलता दर्शविली आहे.
जाइल्स म्हणाले, आम्ही इंग्लंडच्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंना सामील करण्याचा विचार  करणार आहे. आम्हाला पूर्ण एफटीपी वेळापत्रक प्राप्त झाले आहे. तर जर पाकिस्तान आणि बांगलादेशचा दौरा (सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये) वेळापत्रकानुसार पुढे गेला तर मला आशा आहे, की आमचे सर्व खेळाडू तिथे असतील.
बीसीसीआय सप्टेंबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये टी-२० विश्वचषक संपल्यानंतर आयपीएलसाठी विंडो शोधत आहे. सप्टेंबरमध्ये इंग्लंड संघ बांगलादेशला भेट देईल. भारतबरोबर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भाग घेतल्यानंतर ऑक्टोबरच्या मध्यात ते पाकिस्तान दौरा करतील
त्यानंतर इंग्लिश संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळेल. त्यानंतर इंग्लंड डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाईल. त्यामुळे इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास वाव नाही, असे जाइल्स यांनी स्पष्ट केले आहे.