मँचेस्टर : कोरोनाचा जबरदस्त फटका भारत आणि इंग्लंड संघाला बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारी पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आलेला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे इतर खेळाडूंना देखील कोरोना संसर्गाचा धोका असल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करुन सर्व शक्यता पडताळून पाहिल्या आहेत. दोन्हीकडील अधिकाऱ्यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो या भीतीने सामना रद्द करण्यात आलेला आहे. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहकाऱ्यांची माफीही मागण्यात आली आहे. भारतीय संघामधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे, असे ईसीबीने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ मैदानामध्ये उतरु शकत नाही, असा उल्लेखही ईसीबीच्या अधिकृत पत्रकामध्ये आहे. तसेच सामना रद्द झाला असला तरी मालिका बरोबरीमध्ये सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार, याची घोषणा अद्याप झालेली नाही.