मुंबई - कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाविरुद्ध सामन्यात पराभव झाल्याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मुलीला धमक्या दिल्या जात आहेत. बुधवारी (दि.7) झालेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नईला 168 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. या सामन्यानंतर सोशल मीडियावर युझर्सने चेन्नईच्या फलंदाजीवर बोट उचलली जात आहेत. युझर्स सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करत आहेत.

सामन्यात पराभव झाल्यानंतर खेळाडूंना सोशल मीडियावर टार्गेट केले जाते, ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु चेन्नईच्या पराभवानंतर एक धक्कादायक पोस्ट समोर आली आहे. महेंद्र सिंह धोनीची पाच वर्षांची मुलही झिवाला बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ 10 धावांनी पराभव झाल्याने धोनीची पत्नी साक्षीच्या इन्स्टाग्रामवरही आक्षेपार्ह कमेंट केल्या जात आहेत.

या धमकीचा शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे, त्यांनी ट्रोलर्सची कानउघडणी केली आहे.

'सोशल मीडियाचा वापर किती चुकीच्या पद्धतीने केला जातो याचे हे किळसवाणे उदाहरण आहे. या वृतीच्या लोकांकडे दुर्लक्ष केले तर आपण अशा विकृत मानसिकतेच्या लोकांनी जे स्त्रियांबद्दल वाईट विचार करतात त्यांच्या वागणूकीला खतपाणी घालतोय', असं ट्विट प्रियांका चतुर्वेदी यांनी केले आहे.