नवी दिल्ली : दिल्लीचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलदांच श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यानंतर दिल्लीच्या कर्णधारपदी रिषभ पंतची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर रिषभ पंतने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर पहिल्यादाच व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. आयपीएलच्या आगामी मोसमासाठी स्वत:ला फिट करत असल्याचे रिषभने या व्हिडीओत सांगितले आहे.  त्याचा हा नवा व्हिडीओ अनेकांना आवडत आहे. अनेकजण त्याची कर्णधारपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करत  आहे. 

काय आहे या व्हिडीओत ? : या व्हिडीओत रिषभ पंत वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सर्साईजचे प्रकार करताना दिसत आहे. यामध्ये रनिंग, डंबल उचलणं, स्ट्रेचिंग यांचा समावेश आहे. व्यायाम करताना तो प्रचंड घामाघूम झालेलाही दिसत आहे. या व्हिडीओला त्याने कॅप्शनही दिले आहे. "मी स्वत:ला पुन्हा एकदा फिट करतोय. मी आता दिल्ली कॅपिटल्सची जर्सी घालण्यासाठी उत्सुक आहे", असे त्याने कॅप्शमध्ये म्हटले आहे. 

रिषभ पंतची आयपीएलमधील कामगिरी : रिषभ पंत 2016 सालापासून आयपीएलमध्ये खेळतो आहे. आतापर्यंत 2018 चे सीझन त्याच्यासाठी खास ठरले आहे. त्या सीझनमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 684 धावा केल्या होत्या. गेल्या सीझनमध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 343 धावा केल्या होत्या. रिषभने आतापर्यंत 68 सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 2079 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

9 एप्रिलपासून आयपीएलचा धूमधडाका : यंदाचा आयपीएलचा हगांम 9 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिला आणि सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक खेळाडू आपापल्या टीमसोबत जुळले गेले आहेत. अनेक जण सध्या क्वारंटाईन आहेत.