मुंबई : आयपीएलच्या १४  व्या पर्वातील दोन बलाढ्य संघ आज भिडणार आहे. एकीकडे भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई  तर दुसरीकडे भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ एकमेकांना टक्कर देणार आहे. दोन्ही संघांमधील आजचा पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

दोन्ही तगडे संघ : या हंगामात विराट कोहलीची टीम अद्याप हरलेली नाही. यापूर्वी बंगळुरुने खेळलेले सर्वच्या सर्व म्हणजे ४ सामने जिंकले  आहे. त्याच बळावर बंगळुरु संघाने  गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे धोनीच्या सीएसकेनेही विजयाची हॅटट्रिक केली आहे. पहिल्या ४ सामन्यात फक्त पहिला सामना गमावल्यानंतर पुढील तीन सामने चेन्नईने जिंकले आहे. धोनी असो वा विराट, दोघेही विजयाच्या रुळावर धावत आहेत. पण आज कुणाची तरी एक टीम हरणार आहे. एकतर धोनी विजयी चौकार ठोकू शकेल किंवा विराट कोहलीच्या विजयी मोहिमेतील पाचवा विजय आज विराट नोंद करेल.

टॉस जिंकणे ठरणार महत्त्वाचे : मुंबईच्या वानखेडेचा विचार करता या ठिकाणी यंदाच्या आयपीएलच्या हंगामात झालेल्या ८ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही कर्णधारांसाठी आजच्या सामन्यामध्ये टॉस जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. टॉसवर पुढची बरीच गणिते अवलंबून असणार आहे.