बडोदा : तुम्ही म्हणत असाल की मी फिट आहे, माझी बॉडीही फिट आहे, तर अशा गैरसमजात राहू नका. कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण बॉडीबिल्डिंगमध्ये अनेक किताब पटकवणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनामुळे निधन झाले आहे. जगदीश अवघ्या 34 वर्षाचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला. जगदीशच्या जाण्याने बॉडीबिल्डिंग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नवी मुंबईत राहणाऱ्या जगदीशने गेल्या वर्षी बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यासाठी तो बडोद्यात असायचा. गेल्या काही दिवसांपूर्वी जगदीशला कोरोनाची लागण झाली होती. अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

कोणत्याही स्पर्धेसाठी जगदीश उभा राहिला की पदक निश्चित असायचे. त्याचे पिळदार शरीर सर्वांना आकर्षित करत होते. त्यासाठी जगदीश दिवसरात्र मेहनतही करायचा. रोज सकाळी उठून दोन तास व्यायम, चांगला डाएट, चिकन, अंडी, मटण असे रोजचा जगदीशचा आहार असायचा. 

जगदीशने कमी वयात बॉडीबिल्डिंगला सुरुवात केली होती. त्याने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये जवळपास चार वेळा सुवर्णपदकाची कमावले होते. त्याने मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदकावर नाव कोरले होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्यपदक मिळवले होते.