औरंगाबाद : शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणा-या एकाला जिन्सी पोलिसांनी छापा मारुन पकडले. ही कारवाई 10 ऑक्टोबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास जुना मोंढा भागात केली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश कचरु व्यवहारे (35, रा. गल्ली क्र. 5, न्यू हनुमाननगर) या मजूराला अटक केली आहे. त्याच्याकडून सट्ट्यातील 24 हजारांची रोकड आणि दोन मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या प्रकरणातील पडद्यामागील मुख्य सूत्रधार मनोज दगडा याच्यासह अन्य बुकींचा पोलिस शोध घेत आहेत.
दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणारे आयपीएलचे क्रिकेट सामने यंदा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. मागील 29 सप्टेंबरपासून हे सामने दुबईतील आबुधाबी येथे सुरू आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आठ संघांचा समावेश असून, 60 सामने रंगणार आहेत. त्यात सहभागी असलेल्या संघाचे प्रत्येकी सहा ते सात सामने झाले आहेत. या सामन्यांसह विविध देशात रंगणा-या क्रिकेट सामन्यांवर देखील बुकींकडून सट्टा लावला जातो. यातून कोट्यावधींची उलाढाल होत असते. मुंबई, दिल्ली, हैदराबाद यासह अन्य मेट्रो सिटीत बसून बुकी सेटींग करतात. त्यांचे पंटर विविध शहरात विस्तारलेले आहेत. त्यांच्या मदतीने क्रिकेटचा सट्टाबाजार प्रत्येक शहरात तेजीत सुरू आहे. यात मोठ्या संख्येने युवकांना सामावून घेतले जाते. मोबाईलवरच सर्व व्यवहार सुरू असल्याने पोलिसांना त्याची भनक लागू दिली जात नाही. पण गेल्या पाच वर्षापासून शहरात पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई सट्टेबाजांवर करण्यात आली नव्हती. मात्र, जिन्सी पोलिसांनी माहिती मिळताच कारवाई केल्याने त्यांच्या हाती मोठा मासा लागला आहे. या माशाला पाच वर्षांपुर्वी देखील तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते. पण हा त्यानंतरही तो सक्रिय असल्याचे जिन्सी पोलिसांनी केलेल्या कारवाईवरुन समोर आले आहे. त्यामुळे एकंदरीतच तत्कालीन पोलिस अधिका-याच्या थातूरमातूर कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी कुख्यात सट्टेबाज मनोज दगडा याच्यासह त्याचे हस्तक गणेश व्यवहारे, निसार आणि खान यांच्याविरुध्द जिन्सी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मनोज दगडा हा सट्टा जिंकल्यावर त्याच्या हस्तकांमार्फत पैसे पुरवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. यात आसीफ भाई, अमजत सेठ, साजीद, मामू असे हस्तक देखील मोबाईल आयडीद्वारे आयपीएलवर पैसे लाऊन सट्टा खेळवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही कारवाई निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार हारुण शेख, पोलिस नाईक संजय गावंडे, शिपाई सुनील जाधव, संतोष बमनावत, होमगार्ड शेख बासीत यांनी केली.

2014 नंतर दुसर्‍यांदा अडकला जाळ्यात : सन 2014 मध्ये तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक व कर्मचार्‍यांनी मयत नरेश धर्माजी पोतलवाड तसेच मनोज दगडा आणि दत्ता खडके यांना आयपीएल सट्टाप्रकरणी अटक केली होती. पुढे आर्थिक गुन्हे शाखेच्या त्या अधिकार्‍याची गुन्हे शाखेत बदली झाली. त्यानंतर दोनवेळा गुन्हे शाखेची धुरा सांभाळलेल्या या अधिकार्‍याने माहिती असूनही एकदा सुध्या मुख्य सट्टेबाजावर हात का टाकला नाही. सध्याही हा अधिकारी शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. दरम्यान, जिन्सी पोलिसांच्या आजच्या या कारवाईवरुन तोच सट्टेबाज सक्रिय असल्याचे दिसून येते.

देशभरात सट्टेबाजांचे जाळे : शहरातील सट्टेबाजांची पाळेमुळे खोलवर रूजलेली आहेत. त्यांच्यासोबत अनेक बड्या हस्तींची नेहमीच उठबस आहे. विविध कार्यक्रमात या सट्टेबाजांसोबत स्थानिक राजकीय पुढारी, उद्योजक, शासकीय अधिकारी व कर्मचारी नेहमीच दिसून येतात. त्यातच काही पोलिस अधिकार्‍यांचे अर्थपुर्ण हितसंबंध असल्यानेच ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. दरम्यान, या बुकींचे देशभरात जाळे पसरलेले आहे. यातून कोट्यावधींची उलाढाल होत असतानाही पोलिस यंत्रणा मात्र अनभिन्न असल्याचे दिसून येते.