नवी दिल्ली : टी-20 वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधार होण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. केवळ टी-20 नव्हे, तर वनडे टीमचा देखील तो कर्णधार असू शकतो. कर्णधार असलेला विराट कोहली आपल्या फलंदाजीवर सर्वाधीक लक्ष देण्याचा विचार करत आहे. त्याच विचारातून तो टी-20 आणि वनडे टीमची जबाबदारी रोहितच्या खाद्यावर देऊशकतो. टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या सूत्रांचा दाखला देत दिलेल्या माहितीनुसार, टी-20 विश्व चषक संपल्यानंतर विराट कर्णधार पद सोडण्याची घोषणा करू शकतो, अशी माहिती मिळते.
एवढेच नव्हे, तर विराटने यासंदर्भात भारतीय व्यवस्थापनाशी रोहितला कशी जबाबदारी देता येईल यावर चर्चा केलेली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या पावलावर पाऊल ठेवून विराट सुद्धा आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष देण्यासाठी कर्णधार पद सोडू इच्छित आहे. धोनीने सुद्धा याच कारणास्तव विराटला कर्णधार केले होते. यासाठी विराट रोहितवर विश्वास दाखवत आहे.

कर्णधार पदाच्या दबावामुळे बॅटिंगवर परिणाम : टी-20, वनडे आणि टेस्ट सामन्यांमध्ये सुद्धा विराटच्या बॅटिंगवर कर्णधारपदाचा दबाव दिसून येतो. विराटने टेस्टमध्ये शेवटचा शतक नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकला होता. फलंदाजी सुधारण्यासाठी कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे लागेल असे विराटला वाटते. त्यातच 2022 आणि 2023 मध्ये टीम इंडियाला वनडे आणि टी-20 असे दोन्ही वर्ल्ड कप खेळायचे आहेत. अशात विराटने आपल्या बॅटिंगवर फोकस करणे टीमसाठी देखील आवश्यक आहे.