नवी दिल्ली - भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून या दौऱ्यात आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून खेळणारा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज याचीदेखील निवड झाली आहे. त्यामुळे सध्या सिराज भारतीय संघासोबत सिडनी येथे क्रिकेटचा सराव करत आहे. दरम्याम शुक्रवारी (दि.२०) सिराजचे वडील मोहम्मद गौस यांचे निधन झाले आहे. गौस हे 53 वर्षांचे होते आणि त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार झाला होता. हैदराबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दु:खाची बाब म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाने लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सिराजला वडिलांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहता येणार नाही. कोरोनाच्या निर्बंधांमुळे तो मायदेशी येऊ शकत नाही. परिणामी, तो वडिलांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकणार नाही. सिराजचे वडील रिक्षाचालक होते. हालाखीच्या परिस्थितीत असतानाही केवळ मुलाचे क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कमाई सिराजसाठी खर्च केली.

पिता मोहम्मद गौस यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर सिराजने एक भावूक संदेश दिला आहे. सिराज म्हणाला की, 'हा माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार गमावला आहे. मला देशासाठी खेळताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते. मी त्यांचे स्वप्न पूर्ण केल्याचा मला आनंद आहे.'