मुंबई : टीम इंडियाचा यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराह प्रसिद्ध स्टार अँकर संजना गणेशनसोबत विवाहबद्ध झाला आहे. गोव्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला आहे. या दोघांचे विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मागील काही दिवसांपासून जसप्रीत बुमराह आणि संजना यांच्या लग्नच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. 

जसप्रीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. 'आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे' असे कॅप्शन त्याने हे फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे.

कोण आहे जसप्रीतची पत्नी संजना?
संजना गणेशन 'स्प्लिट्स व्हिला 7' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली होती. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडल होती. संजनाने 'फेमिना ऑफिशियली गॉर्जियस' हा किताब जिंकला होता. त्यानंतर २०१२ मध्ये तिने 'फेमिना स्टाइल दिवा' मध्ये भाग घेतला होता. तिने २०१३ मध्ये फेमिना गॉर्जियसचे विजेतेपद जिंकले होते. २०१४ मध्ये संजना 'फेमिना मिस इंडिया पुणे' या स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. संजनाने २०१९ मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर 'मॅच पॉईंट' शोचे सुत्रसंचालन केले होते.