मुंबई : इंडियन प्रीमयर लीग म्हणजेच आयपीएलचे यंदाचे वेळापत्रक जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. येत्या 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयपीएल सामने रंगणार आहेत. गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत या वेळापत्रकावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते अधिकृत जाहीर केले जाईल. आयपीएलच्या 14 व्या मोसमाचे नियोजन आणि कोणत्या मैदानावर सामने भरवायचे याबाबत गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. पुढील आठवड्यात ही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्याने एनआय या वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली. “आयपीएल 14 ला येत्या बैठकीत मंजुरी मिळेल. त्यानुसार 9 एप्रिलला आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्याची अपेक्षा आहे. हे सामने कुठे भरवायचे याबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल” असेही त्यांनी सांगितले.
बीसीसीआयमधील पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहिती आधारे एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सुरुवातीला आयपीएलमधील सामने एकाच शहरात भरवण्याचा विचार सुरू होता. मात्र, आता कोरोनाची परिस्थिती सामान्य होऊ लागल्याने एकापेक्षा अधिक शहरांत सामने भरवण्याचा विचार सुरू आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद या शहरांचा प्रामुख्याने विचार होत आहे’.