नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आयपीएललाही फटका बसला आहे. आयपीएल 2021 ची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलने स्पर्धा रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.

देशभर कोरोनाचा उद्रेक होत असूनही आयपीएलच्या स्पर्धा सुरुच होत्या. खेळाडूंसाठी बायो बबलचे नियम होते. मात्र तरीही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कालचा आरसीबी विरुद्ध केकेआर हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे आयपीएलची स्पर्धा आता रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. दरम्यान काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.