नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरू होणार आहे. याच आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक मोठी अन् आनंदाची बातमी येवून धडकली आहे. बुधवारी आयपीएल आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीएलसाठी मैदानामध्ये प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सच्या संघात हा सामना रंगणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
हा सामना आमच्यासाठी खास असणार आहे, कारण आयपीएल आता त्यांच्या चाहत्यांचे स्टेडियममध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज झालेले आहे. कोरोना परिस्थितीमुळे असणाऱ्या निर्बंधांमुळे असणारी चाहत्यांच्या उपस्थितीवरील बंदी उठवण्यात आलेली आहे, असे आयपीएलने जाहीर केले आहे. १६ सप्टेंबरपासून या सामन्यांची तिकीट चाहत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुनदेण्यात आले आहे. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच iplt20.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच latinumList.net या वेबसाईटवरुनही तिकीटे विकत घेता येणार आहे.