अ‍ॅडलेड- अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण केलेल्या भारतीय संघाचे आव्हान तिसऱ्या दिवशी केवळ चार तासांत संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने भारताचा कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच 8 विकेट्सनी पराभव केलाय. सामन्याच्या चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 90 धावांची गरज होती. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने केवळ 2 विकेट्स गमावत 21 ओव्हर्समध्येच भारताने दिलेले लक्ष्य गाठून विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कांगारुंनी टीम इंडियाला दुसऱ्या डावात झटपट धक्के दिले. त्यामुळे टीम इंडियाची 9 बाद 36 अशी स्थिती झाली. त्यामुळे 36 धावांवरच टीम इंडियाचा डाव घोषित करण्यात आला. मालिकेत टीम इंडियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. तसेच टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माचीही दुसऱ्या कसोटी सामन्यात वापसी होण्याची शक्यता कमी आहे. याव्यतिरिक्त मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अजिंक्य राहणेच्या नेतृत्त्वात पुढील तीन कसोटी सामने खेळणाऱ्या टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जाणे कठिण होणार आहे.