नवी दिल्ली : देशात सुरु असलेल्य्य कोरोना संकटाचा धसका आयपीएलमध्ये खेळत असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी घेतला आहे. राजस्थान रॉयल्सच्या अँड्र्यु टाय हा ऑस्ट्रेलियात परत गेल्यानं अजून दोन खेळाडूंनी स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी स्पर्धा सोडण्याचे जाहीर केले आहे. अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन आयपीएलमध्ये कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमधून खेळत होते. बंगळुरुने टि्वट करत हे दोन खेळाडू स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. ‘अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन दोघेही वैयक्तिक कारणांसाठी ऑस्ट्रेलियात परतले आहेत. यापुढच्या सामन्यात ते खेळणार नाहीत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यांच्या निर्णयाचा सन्मान करते. त्यांना संपूर्ण मदतही करत आहे’, असे टि्वटरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने केले आहे.
भारतातील कोरोना स्थिती पाहता खेळाडू एक एक करत स्पर्धेतून माघार घेत आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आयपीएलमधून ब्रेक घेतला आहे. कुटुंबाला कोरोनाची लागण झाली असल्याने आर अश्विनने हा निर्णय घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या हंगामातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये सनरायजर्स हैदराबादचा पराभव केल्यानंतर आर अश्विनने टि्वट करत ही माहिती दिली.
अँड्र्यु टाय मायदेशी गेल्यानं राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या जाण्यानं राजस्थान संघात आता चार परदेशी खेळाडू उरले आहेत. त्यात जोस बटलर, ख्रिस मॉरिस, डेविड मिलर आणि मुस्तफिजुर रहमान यांचा समावेश आहे. 

[removed][removed]