औरंगाबाद : आज शनिवार 17 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. विधिवत घटस्थापना करून नवरात्रोत्सव सुरू होत असला तरी औरंगाबादेतील कर्णपुरा दसरा महोत्सव यात्रा यंदा कोरोनाच्या कारणामुळे भरणार नसल्यामुळे भक्तगण हिरमुसले आहेत.
मराठवाड्यात प्रसिद्ध असलेली कर्णपुरा यात्रा यंदा स्वातंत्र्यानंतर गेल्या 73 वर्षात रद्द होण्याची ही तिसरी वेळ असल्याची माहिती कर्णपुरा देवीचे पुजारी जगन्नाथ दानवे पाटील यांनी दिली. बिकानेरचे राजा कर्णसिंह हे 1835 मध्ये शहरात वास्तव्यास आले होते. त्यांच्या नावानेच कर्णपुरा ओळखला जातो. त्यांनीच कर्णपुरा देवीचे मंदिर उभारले. तेव्हापासून कर्णपुर्यात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आला आहे. स्वातंत्र्यापूर्वी येथे छोट्या प्रमाणात यात्रा भरत असे. पण, नंतर जसजशी शहराची लोकसंख्या वाढत गेली तसतसा यात्रेचा आकार वाढत गेला. नवरात्रीत सुमारे दहा ते बारा लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. राज्यातील व परराज्यातील सातशे विक्रेते या ठिकाणी आपले स्टॉल लावतात. यातून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होते, असे छावणी परिषदेचे पदाधिकारी किशोर कच्छवाह यांनी सांगितले. यंदा मात्र कोरोनामुळे कर्णपुरा यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनासह छावणी परिषदेने घेतला आहे. गेल्या 73 वर्षात तिसर्‍यांदा यात्रा रद्द करण्याची वेळ आली आहे. 30 सप्टेंबर 1993 मध्ये किल्लारीचा भूकंप झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात यात्रा भरविण्यात आली नव्हती. दुसर्‍याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरतमध्ये प्लेगची साथ आली होती. त्यावर्षी ही कर्णपुरा यात्रा रद्द करण्यात आली होती, असे कच्छवाह यांनी सांगितले.