पैठण - शहरातील खंडोबा मंदिर चौका लगत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा भूखंड नोटरी आधारे कवडीमोल भावात खरेदी-विक्री करण्याचा सपाटा शहरातील काही धनदांडगे व राजकीय व्यक्तींनी लावला आहे. असाच काहीसा प्रकार शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या तसेच मोक्याची जागी असलेला महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा सिटी सर्वे न.1026 क्रमांकाचा भूखंड ज्याची बाजार भावाप्रमाणे कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या भुखंडाची भु-माफिया कडून बेकायदेशीरपणे विक्री करण्याचा घाट शिजत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे महसूल व नगर परिषद डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पैठण शहरात शासनाची जमीन अन् विकतो तिसराच असा प्रकार सुरू असल्याने शासनाला कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या जमिनीवर पाणी सोडावे लागत असून शासनाला कोट्यवधी रुपयाचा फटका बसत आहे. शहराच्या बसस्थानक परिसरातील नाथ मंदिराकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेला सिटी सर्वे न.1026 क्रमांकाचा भूखंड खरेदी-विक्रीचा घाट काही धनदांडगे व राजकीय पुढार्‍यांशी संगणमत करुन व कब्जेदारावर दबाव आणुन नोटरीच्या आधारे खरेदी करून भूखंडाचा श्रीखंड करण्याचा बेत आखला आहे. हा बेत तालुका प्रशासनाने उधळून लावला अशी मागणी जनतेतून होत आहे. या संदर्भात जागरूक नागरिकांनी तहसीलदार यांना तक्रार करताच या संबधी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पैठण सजाचे मंडलाधिकारी बागुल व तलाठी गाढे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

याबाबत मंडळधिकारी बागुल यांनी दि.10 नोव्हेंबर रोजी भूखंड क्रमांक 1026 चा पंचनामा केला असता, सदर पंचनाम्यामध्ये कब्जेदार हबीबुर रहेमान पिता शेख महेबूब यांनी शासनाची जमीन नोटरी आधारे विक्री केल्याचे कबुली दिल्याचे व पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर ही तहसील प्रशासनाकडून जमीन ताब्यात घेण्या संबधी अद्याप ही कुठली ही हालचाल दिसत नसल्याने सामान्य जनतेत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नोटरी आधारे सर्रासपणे खरेदी विक्री व्यवहार
शहरातील बर्‍याच मालमत्ता या शासनाच्या जमिनीवर असून पीआरकार्ड अथवा सातबार्‍यावर मालकी हक्‍कात महाराष्ट्र शासन असुन ताबा, मात्र खासगी लोकांचा आहे. अशा लोकांना थोडे अधिक रक्‍कम देण्याचा अमिष देत कब्जेदाराकडून जमिनीचे नोटरी आधारे खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू आहे. त्यानंतर संबधित विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून नियमानुसार जमिनी आपल्या नावावर लावण्याचा प्रकार पैठण शहरात सर्रास सुरू असल्याचे बोलले जात आहे. नोटरीयन सुद्धा कागदपपत्रांची शहानिशा न करता नोटरी करीत असल्याने बेकायदेशीर खरेदी-विक्रीचे व्यवहार सर्रासपणे सुरू असून नोटरीवर आधारित व्यवहार संशयास्पद आहेत.