बीड: जिल्हा बँक अजूनही शेतकर्यांना पीक कर्ज द्यायला तयार नाही. हजारो शेतकरी अजूनही पीक कर्जापासून वंचित आहेत. आजच वडवणी तालुक्यातील शेतकर्यांची पिक कर्ज मिळत नसल्या बाबत ची तक्रार प्राप्त झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये अन्य बँका वैद्यनाथ कारखान्याला कर्ज देत नाहीत म्हणून डीसीसी बँकेने सतरा कोटी रुपयांचे कर्ज देऊ नये. अन्यथा संचालकांना पुन्हा एकदा जेलवारी करावी लागेल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अ‍ॅड. अजित एम. देशमुख यांनी दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परळी सह माजलगाव, जय भवानी आणि अंबाजोगाई साखर कारखान्यांना थकहमी मंजूर केली आहे. अन्य तीन कारखान्याची परिस्थिती चांगली असल्याने व अन्य बँकांची मोठ्या प्रमाणात कर्ज नसल्याने त्या कारखान्यांना अन्य बँका कर्ज देण्यास तयार असल्याचे समजते.
मात्र वैजनाथ कारखान्याकडे कडे मोठ्या प्रमाणात कर्ज थकलेले आहे. अनेक बँकांचे कर्ज वैद्यनाथ कारखान्याकडे आहे. आज डी.सी.सी. बँकेच्या संचालक मंडळाची सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये एकूण दहा विषय चर्चेला येणार असून विषय क्रमांक पाच मध्ये बँकेकडे आलेल्या कर्ज प्रस्तावावर निर्णय घेणे बाबत एक विषय ठेवण्यात आला आहे. यापूर्वीही जिल्हा बँक वैद्यनाथ कारखान्याला दहा कोटी रुपये कर्ज देण्यास निघाली होती. मात्र आमच्या तक्रारीमुळे तो निर्णय त्यावेळी रद्द करावा लागला. डीसीसी ने आता कोणतीही चूक करू नये. अन्यथा या बँकेत पुढे उपोषणासाठी तंबू ठोकावा लागेल, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
अनेक कारखान्यांचे कर्ज थकलेले असताना डीसीसी बँक वैजनाथ कारखान्यांना कर्ज देण्याच्या तयारीत आहे. एका कारखान्यासाठी असा हट्ट का असावा? हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित ठेवून आज तागायत मोठ्या ठेवी देत शेतकर्यांची या बँकेने फसवणूक केली आहे. आता शेतकर्यांच्या कर्जा ऐवजी मोठे आणि तोट्यातील या संस्थांना कर्ज दिले आणि मोठ्या ठेवी दिल्या, तर या बँकेकडे पुन्हा एकदा लक्ष द्यावे लागेल आणि संचालक मंडळाला जेलवारी घडवावी लागेल, असा इशाराही देशमुख यांनी दिला आहे.