वैजापूर - धनादेशाद्वारे दुसर्‍याच्या बँक खात्यातून एका महिलेने दोन लाखाची रक्कम वटवल्याचा धक्कादायक प्रकार स्टेट बँक ऑफ इंडिया म्हसोबा शाखेत घडला. रोशनी अतुल वेताळ असे पैसे काढणार्‍या संशयित महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या महिलेने विजय विश्वनाथ वराडे (रा. शिरसगाव, वैजापूर) ह.मु नाशिक यांच्या बँक खात्यातून दोन लाखाची रक्कम तिच्या नावावर बँक खात्यात वळते केल्याचा प्रताप केल्यावर या महिलेने खातेदार वराडे यांचा मोबाईल क्रमांक शोधून त्याना तुमच्या खात्यातून मी दोन लाखाचा चेक क्लिअर केला. एका महिन्यात 3 टक्के व्याजासहित या रकमेचा पुन्हा तुमच्या बँक खात्यात भरणा करील, तुमच्या या दोन लाखामुळे दोन लहान मुली आई व बापा पासून आज अनाथ होता होता वाचल्या असा भावनिक संदेश पाठवला.

या प्रकारामुळे चक्रावून गेलेले विजय वराडे यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंनत कुलकर्णी यांना घडलेल्या प्रकाराची महिती दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित आरोपी रोशनी अतुल वेताळ विरुद्ध वैजापूर पोलिसांनी फसवणूकीसह इतर कलमाखाली गुन्हा नोंदवला.या प्रकरणाचा तपास अधिकारी अमोल ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय वराडे यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अंबड (नाशिक) येथे खाते आहे. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ते पत्नीसह गावी शिरसगाव येथे आई वडीलांच्या भेटीसाठी आले होते. त्या दरम्यान प्रवासात त्यांच्या कडील कोरा धनादेश गहाळ झाला होता. असे त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान 9 ऑक्टोबरला त्यांच्या बँक खात्यातील एकूण साडेआठ लाखांपैकी 1 लाख 99 हजार रुपयांची रक्कम रोशनी अतुल वेताळ या महिलेने धनादेशाद्वारे तिच्या खात्यात जमा करुन काढून घेतली. बँकेतून पैसे काढल्यावर याच महिलेने त्यांच्या मोबाईलवर पैसे काढल्याचा मेसेज पाठवल्यावर त्यांना प्रकार कळाला. त्यांनी वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला त्या महिलेने तिच्या मोबाईल क्रंमाकावरुन एक महिन्याने 3 टक्के व्याजासहित रक्कम परत करील असा पाठवलेला संदेश दाखवला. तिच्या भावाला पोलिसांनी बोलावून सबंधिताला रक्कम परत करा, असे सांगितले मात्र त्याच्या कडून प्रतिसाद मिळत नसल्याने रोशनी अतुल वेताळ हिच्या विरुद्ध फसवणूकीसह इतर कलमाखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.