औरंगाबाद - मागील आठ दिवसांपासून रेल्वेस्टेशन रोडवरील गोपाळ टी हाऊसजवळ जुन्या 700 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती शोधण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी करीत होते. मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे अखेर पुण्याहून पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 29) सकाळी पाणबुडे थेट जलवाहिनीत शिरले. दिवसभरात 13 ठिकाणी गळत्या शोधून त्या बुजवण्यात आल्या. रात्रीही पाणबुड्यांची उशीरापर्यंत गळत्यांची शोधमोहीम सुरूच होती.

रेल्वेस्टेशनपासून क्रांतीचौकापर्यंत सिमेंट काँक्रिटचा रस्ता आहे. या रस्त्यात कुठे रस्त्याच्या कडेला तर कुठे रस्त्याच्या मध्यातूनच पाणीपुरवठ्याची जुन्या योजनेची 700 मिमी. व्यासाची जलवाहिनी गेलेली आहे. अलीकडे तीन-चार वर्षांपासून याच परिसरात जागोजागी या जलवाहिनीला गळती लागत आहे. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी गोपाळ टी हाऊसजवळ या जलवाहिनीला जागोजागी गळती लागली. विशेष म्हणजे या ठिकाणी काँक्रिट रस्त्याच्या मध्यभागातूनच जलवाहिनी गेलेली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्‍यांनी कडेने काँक्रिटच्या खालून रस्ता खोदून गळत्यांचा शोध घेतला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. 

विशेष म्हणजे या भागात टाकण्यात आलेली वाहिनी ही सिमेंटची आहे.त्यामुळे तिला खोदताना अधिक इजा होऊन गळती अधिक वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने पुण्याहून पाणबुड्यांना पाचारण केले. तीन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर मंगळवारी सकाळी पाणबुडे शहरात दाखल झाले. सकाळी साडेनऊ वाजता गळतीपासून 300 मीटर अंतरावर काही भागात लोखंडाची वाहिनी आहे, तिला व्होल पाडून त्यातून पाणबुड्यांनी जलवाहिनीत प्रवेश केला. दिवसभरात 13 ठिकाणच्या वाहिनीच्या अंतर्गत गळत्यांना जोडण्यात आले. त्यानंतरही रात्री उशीरापर्यंत आणखी गळत्यांचा शोध पाणबुडे घेत होते. काम पूर्ण करूनच पाणबुडे बाहेर येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी माहिती देताना सांगितले. धांडे हे काम सुर झाल्यापासून रात्री काम पूर्ण होईपयर्र्ंत घटनास्थळीच होते.

पाणीपुरवठा सुरळीत होईल...

या जलवाहिणीतून जिन्सी, शहागंज जलकुंभावरील भागांना पाणीपुरवठा होतो. गळत्यांमुळे 20 टक्केच जलवाहिनी सुरु होती. मात्र आता पुणे येथे पाणबुडे आले आहेत. त्यांनी जलवाहिनीच्या आत जाऊन गळत्यांची दुरुस्ती केली त्यामुळे दोन्ही जलकुंभांवरील पाणीपुरवठा सुरळीत होईल.

- किरण धाडे, कार्यकारी अभियंता