उमरगा (महादेव पाटील): आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली असल्याचे चित्र आहे. सध्या शहरातील अंतर्गत राजकारणामध्ये अनेक मोठे बदल, नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याचे संकेत आहेत. स्थानिक पातळीवर निवडणुका लढवण्यासाठी एकमेकांना पूरकच उमेदवार सर्व पक्ष देण्याच्या तयारीत आहेत. शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या नगरपालिका मध्ये नगरसेवक होण्यासाठी नव्या चेहर्‍यांनी तयारी सुरू केली आहे.
उमरगा नगरपरिषद निवडणूक तालुक्याला नवी राजकीय दिशा देणारीच ठरणार आहे. तालुक्यात यावेळीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. राजकीय आखाड्यातील निवडणुकांत कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हेच सध्या तालुक्यातील राजकारणात दिसून येत आहे.आताच्या परिस्थितीत उमरगा शहारत कुठलाही राजकीय पक्ष भक्कम केडरचा नाही. सर्वच पक्षात गटबाजी दिसून येत आहे. नवीन निवडणूक, नवीन उमेदवार असेच जणू समीकरण बनत चालल्याने अनेक तरुण उमेदवारांना आपसूक संधी मिळणार आहे. परंतु नेहमीचा हा प्रयोग यशस्वी होणार का? हे मात्र पाहावे लागणार आहे .
राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, असे दिसते. काही दिवसांपूर्वी उमरग्यात नगरपालिका निवडणूकीवर  बैठक झाल्याची  माहिती आहे. उमरगा शहारत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहतात. जिल्ह्यात आदर्श निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढल्यास आश्चर्य नाही. जानेवारी 2021 च्या मतदार यादी प्रमाणे उमरगा शहराची मतदार संख्या 29187 आहे. त्यात पुरुष मतदार संख्या 15108 तर स्त्री मतदार संख्या 14077 आहे. शहरातल्या या निवडणुकीने ग्रामीण निवडणूकांनाही वळण लागते. त्यामुळे पालिका निवडणूकीचे पडसाद आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीच्या निवडणूकांवरही उमटणार आहेत. त्यामुळे आता या सत्तेच्या साठमारीत कोण कसा झुंजतो याकडे आता राजकीय कार्यकर्ते आणि जनतेचेही लक्ष लागले आहे.

राजकीय समीकरणांबाबत संभ्रम : नुकत्याच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कडे इतर मागासवर्गीय महिला उमेदवार आसताना  काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला साथ देऊन निवडूनही आणले. त्यामुळे तालुक्यात येणार्‍या नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपची भूमिका काय असेल हे पाहवे लागणार आहे. पक्षीय राजकारणाबरोबरच व्यक्तिकेंद्रित युती, आघाडीचे समीकरणेही जुळणार का, याबाबत चर्चा सुरू आहे.

आता प्रभागांना क्रमांकासह नावही देणार : प्रभागरचनेमध्ये प्रभागांना अनुक्रमांक देण्यात येतात. प्रभागाचे क्षेत्र चटकन लक्षात यावे, याकरीता प्रभागांना अनुक्रमांकासोबतच प्रभागाचे नाव देण्याचे अधिकार निवडणूक आयोगाने नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. पण प्रभागांना नाव देणे हे बंधनकारक नाही. तरी देखील प्रभागांना नाव देता येईल काय ? हे तपासून पाहावे, असे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.

74 दिवसात पुर्ण करावे लागणार निवडणूक प्रक्रिया : मुदत संपण्यापूर्वीच निवडणूक घ्यायची असेल तर अवघ्या 74 दिवसांत निवडणुकीबाबतच्या अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. त्यात प्रभागरचना करणे, तिला प्रसिद्धी देणे, त्यावरील हरकती स्वीकारून त्यांचा निपटारा करणे, प्रभागांचे आरक्षण जाहीर करणे, मतदार याद्या तयार करणे, अंतिम मतदार यादी जाहीर करणे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून नगराध्यक्षपदाची निवडणूक होईपर्यंतचा कार्यक्रम जाहीर करून त्याची अंमलबजावणी करणे या सर्व बाबी 26 डिसेंबरपर्यंत करणे आवश्यक आहे.