पाचोड : औरंगाबाद-बीड महामार्गावर एका भरधाव बसने दुचाकीस चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना डाबरुळ गावाजवळच्या पुलावर दि.19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली.

या विषयी अधिक माहिती अशी कि, वैजिनाथ बाबुराव चाळगे वय 30 व शेख अफसर वय 50 वर्षे रा.दोघे एकतुणी ता.पैठण हे दुचाकी वरुन जात असतांना एमएच 20 बी.एल 2365 (औरंगाबाद-लातूर) बसने दुचाकीस चिरडले. यात वैजिनाथ चाळगे याचा घटनास्थळी मृत्यु झाला तर शेख अफसर यांचा औरंगाबाद घाटी येथे उपचारादरम्यान रात्री 11 च्या सुमारास मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवाशांनी गाडीखाली अडकलेला मृतदेह व मोटारसायकल बाहेर काढुन पोलिस तसेच 108 क्रमांकावर संपर्क करुन रुग्णवाहिका बोलावली, तर बीट जमादार नुसरत शेख यांनी अपघातात मृत्यू पावलेला वैजिनाथचा देह तसेच जखमी शेख अफसर यांना पाचोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी शेख अफसर यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले, मात्र त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार शिंदे यांनी दिली.