अर्धापूर : साडेतीन शक्तीपीठाची नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून यात्रा करून महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरविषयी जनजागृती व्हावी व रस्ते सुरक्षाविषयी माहिती देण्यासाठी निघालेल्या साताराच्या  हिरकणी महिला रायडर्स ग्रुपमधील महिलेचा  नांदेड-अर्धापूर रस्त्यावरील भोकर फाटा परिसरातील चौकात झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात शुभांगी पवार (रा.सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकास अर्धापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा येथील हिरकणी महिला रायडर्स ग्रुपच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाच्या नवरात्र उत्सव निमित्ताने दुचाकीवरून  महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर  व रस्ते सुरक्षा जनजागृती साठी दर्शन यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला रविवारी  सुरुवात झाली. ही यात्रा कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका, वणीची सप्तश्रृंगी असे साडेतीन शक्तीपिठ ह़ोणार होती. ही यात्रा 10 जिल्हे, 25 तालुक्यातुन एक हजार 868 किलोमीटर प्रवास करीत शूक्रवारी  सातारा येथे सांगता होणार होती. गट प्रमुख मनिषा फरांदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या यात्रेत शुभांगी पवार, अंजली शिंदे, मोनिका निकम (जगताप), अर्चना कुकडे, केतकी चव्हाण, ज्योती दुबे, श्रावणी बॅनर्जी, भाग्यश्री केळकर यांचा समावेश होता. या यात्रेला सातारा येथील पवई नाका परिसरातील शिवतीर्थपासून छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थित प्रारंभ झाला होता. ही यात्रा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन, तुळजापूरची तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन नांदेडमार्गे माहुरला जात होती. सात दुचाकी नांदेडमार्गे माहुरला जात असताना भोकर फाटा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभांगी संभाजी पवार (वय 42 रा.सातारा) यांच्या दुचाकीला (एमएच11 सीए 1447) भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने (जीजे 12 एटी 6957) धडक दिली. यात शुभांगी पवार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शूभांगी पवार यांच्या मृत्यूमुळे या यात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी टाहो फोडला. त्या़ंना अश्रू अनावर झाले.