ढोरकीन : गावातून जाणार्‍या औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्यालगत असलेल्या हनुमान मंदिरासमोरील इंडिया बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.20) रोजी पहाटे उघडकीस आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ढोरकीन येथील हनुमान मंदिरासमोर मुख्य बाजारपेठेत इंडिया बँकेचे एटीएम आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम केबीनबाहेर काढून वाहनातून पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यात 21 लाखांची रोकड असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, यापूर्वीही हे एटीएम पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला आहे. त्याचा काहीसा विसर पडताच पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती येथे घडल्याने नागरिकात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. यापुर्वी एवढी मोठी घटना घडूनही या एटीएमवर सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही, परिणामी अज्ञात चोरट्याने हे एटीएम पुन्हा पळविले.

या घटनेने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बँकेकडून एटीएमवर सुरक्षारक्षक नेमन्यासंदर्भात सतत टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे अशा चोरीच्या घटना घडत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पैठण पोलिस उपविभागीय अधिकारी गोरख भामरे, पैठण एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, बिट जमादार चव्हाण, तुकाराम मारकळ, सतिष राऊत आदींनी घटनास्थळी भेट देऊ पाहणी केली. एटीएम ओढत नेलेल्या रस्त्याने माग काढत एटीएम मशीन शोधून काढन्याचा खुप प्रयत्न केला. दरम्यान श्वान व ठसे पथक आले असता या पथकासही कुठलाच सुगावा लागला नाही.