परभणी - मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा अशी मागणी आज शुक्रवार दिनांक 30 रोजी सकल मराठा क्रांती मोर्चा जिल्हा परभणीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटून करण्यात आली. चव्हाण हे परभणी दौर्‍यावर आले असता जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षात त्यांची भेट घेवून मागणीचे निवेदन देण्यात आले.

मराठा आरक्षण विषय सध्या सुप्रीम कोर्टात असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश, स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीसाठी प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे घटनापीठासमोर योग्यरित्या बाजू मांंडून अथक परिश्रमाने मिळालेले मराठा आरक्षण पूर्ववत करुन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. तसेच आरक्षणाची स्थगिती उठेपर्यंत कसल्याही प्रकारची नोकरभरती करु नये. मराठा समाज व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी न्यायालयास विनंती करुन मराठा समाजाचे आरक्षण पुर्ववत करुन घ्यावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा जिल्हा परभणीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निधी उपलब्ध करुन द्या
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे शुक्रवारी आगमन झाले. पाथरी तालुक्यातील रेणापूर ते सुंदरनगर तांडा, खेडुळा ते देवेगाव, पाथरी ते ढालेगाव, बाभळगाव ते बनई वस्ती लिंबा या शेत रस्त्याच्या कामास लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा मागणी सार्वजनिक मंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आ. बाबाजानी दुर्रानी, माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.