पाचोड : पैठण तालुक्यातील आडगाव जावळे गावाजवळच्या खदानीमध्ये ब्लास्टिंग होत असल्यामुळे गावातील घरांना तडे गेले असून मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी चार खासगी स्टोन क्रेशर सुरू असून त्यांच्या खदानी आहेत. त्यामधून दररोज मोठ्या प्रमाणात दगडाचे उत्खनन केले जाते. स्टोन कंपनीचे चालक हे दगडाचे उत्खनन करण्यासाठी ब्लास्टिंगचा वापर करत असतात. मात्र हेच ब्लास्टिंग परिसरात राहणार्‍या गावकर्‍यांना त्रासदायक ठरत आहे.
यामुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत. हे क्रेशर गावापासून काही अंतरावरच आहे. तेथे ब्लास्ट केल्यानंतर संपूर्ण परिसर हादरतो. घरातील भांडी सुध्दा पडू लागतात. ब्लास्टमुळे दगडे लांबवर येतात. यामुळे मनुष्य हानी देखील होण्याची दाट शक्यता वाढली आहे. यामुळे गावातील बोअरवेलला असलेले पाण्याची पातळीसुध्दा कमी आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी देखील लांबवर वणवण करावी लागते. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.