भवन - ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आता रब्बीची पिके चांगली येणार असल्याचा विश्वास शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांनी रब्बीसाठी ज्वारी, हरभरा, गहू, मका, कादे, भुईमुग आदी पिकांचे नियोजन करत यंदा कल अधिक दिसून येत आहेे. त्याबरोबरच चारा पिकांची लागवड ही पाण्यात घेतली जाणार आहे.खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस व कांदा ,सोयाबीन पिकांबरोबर इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु, आता मात्र रब्बीचे पिक चांगले येण्याची शेतकरी आशा बाळगताना दिसतोय.सिल्लोड तालुक्यात रब्बीच्या पेरणीला वेग आला असून या हंगामात गहू, हरभर्‍यासह ज्वारी, कादे ,मका भुईमुग आदी पिके घेण्यास शेतकर्‍यांचा कल दिसत आहे. मागील वाईट अनुभव पाहता शेतकर्‍यांना उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी लागणार आहे. उन्हाळयात चाराटंचाई निर्माण होऊ नये म्हणून चारापिके घेतल्यास चाराप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.रब्बी हंगामातील पिके ही उपलब्ध पाण्यावरच घ्यावयाची असल्याने त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन योग्य करावे, बियाण्यांचा वापर, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक किड नियोजन, पाणी व्यवस्थापन आदी बाबींचा योग्य अवलंब करावा लागेल.