आष्टी : आष्टी मतदारसंघात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर  अतिरिक्त ताण व रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आ. बाळासाहेब आजबे यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत आष्टी ग्रामीण रुग्णालया करिता रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 25 लक्ष रुपये व शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रा करिता रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी 25 लक्ष रुपये देण्यात यावे या मागणीचे लेखी पत्र जिल्हाधिकारी बीड यांना देण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये आष्टी- पाटोदा- शिरूर विधानसभा मतदारसंघात वाढत असलेली रुग्णांची संख्या व आरोग्य यंत्रणेवर पडत असलेला अतिरिक्त ताण तसेच रुग्णांची होत असलेली हेळसांड या सर्व बाबी लक्षात घेऊन आमदार बाळासाहेब आजबे यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत आष्टी आणि शिरूर तालुक्यासाठी प्रत्येकी 25 लक्ष रूपये रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी दिले आहेत. याबाबतचे लेखी पत्र देखील आ. आजबे यांनी जिल्हाधिकारी जगताप यांना दिल आहे. लवकरच आष्टी ग्रामीण रुग्णालयासाठी आणि शिरूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नवीन आधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असून यामुळे आरोग्य विभागात अपुर्या रुग्णवाहिकेची होणारी अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.