परभणी : संचारबंदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नागरिकांकडून अंमलबजावणी करून घेण्याच्या कामी व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गाची लागन होताना दिसून येत आहे.
मागील काही दिवसापूर्वीच शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात तब्बल चौदा पोलीस अधिकारी व कर्मचारी संक्रमणाने बाधित असल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ शुक्रवार दि. 7 रोजी सायंकाळी आलेल्या अहवालात नानलपेठ पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी, सात कर्मचारी व तीन गृहरक्षक दलातील व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने पोलीस दलात खळबळ पसरली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत पोलीस दलातील कर्मचारी मोठ्या  प्रमाणावर कोरोना संक्रमणाने बाधित होताना दिसत आहेत. बुधवार 5 मे रोजी शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली होती. याचा असल्याचा अहवाल शुक्रवारी दि. 7 मे रोजी प्राप्त झाला असून यामध्ये नानलपेठ पोलीस ठाण्यात बारा कर्मचार्‍यांना या महामारीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून कोरोनाच्या प्रादुर्भावात दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाच्या संक्रमणाने बाधित होत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून पोलीस कर्मचार्‍यांच्या आरोग्य सुरक्षितेसाठी पोलीस प्रशासनाकडून कोरोना  काळामध्ये विशेष उपायोजना करण्याची गरज असल्याचे पोलीस कर्मचार्‍यातून बोलले जात आहे.

सात पोलिसांचा मृत्यू : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर फ्रंटलाईन योद्धा म्हणून सेवा बजावत असताना जिल्ह्यात पोलीस दलातील सात कर्मचार्‍यांचा आता पर्यंत कोरोना विषाणूंमुळे मृत्यू झाला आहे.या मध्ये जिंतूर व परभणी येथील नियंत्रण कक्षातील कर्मचारी तसेच पूर्णा, व  ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी या महामारीमध्ये मृत्युमुखी पडले आहेत.