औरंगाबाद : महापालिकेला शुक्रवारी रात्री अचानक प्राप्त झालेला कोरोना लसींचा साठा शनिवारी दि.8 दुसारनंतरच संपल्याने सर्वच 26 केंद्रांवर गोंधळ उडाला. अनेक केंद्रावर नागरिकांनी कर्मचार्‍यांना जाब विचारत वाद घातला. त्यामुळे ऐनवेळी पोलिसांना धाव घ्यावी लागली. दरम्यान, लसींभावी रविवारी दि.9 आता पालिकेने लसीकरण बंद ठेवले आहे. सोमवारी दि.10 लसींचा साठा मिळाला तरच 45 वर्षावरील व्यक्तींना लस मिळेल, असे आरोग्य विभागाने कळवले आहे.
  मागणीच्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने पालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेचा गोंधळ उडालेला आहे. यातच काही प्रमाणात लस उपलब्ध होताच त्या घेण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होत आहे. दोन दिवसांपूर्वी अनेक लसीकरण केंद्रावर नागरिक व पालिका कर्मचार्‍यांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर दुसर्‍या दिवसी लसीकरण लस नसल्यामुळे बंद ठेवण्यात आले. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत पालिकेला लस मिळाला नव्हती. मात्र रात्री अचानक पाच हजार लसी घेऊन जा, असा निरोप आला. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. शनिवारी शहरातील 26 ठिकाणी लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी लसींचे वाटप झाले. दुपारी दोनपूर्वी अनेक केंद्रावर लसी संपल्याने नागरिकांना माघारी जावे लागले. दरम्यान, बन्सीलालनगर येथील आरोग्य केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र तासन् तास रांगेत बसलेल्या नागरिकांना अचानक लस संपल्याचा निरोप देण्यात आला. त्यामुळे किती लस आहेत, हे आधीच जाहीर करायला पाहिजे. आम्ही एवढा वेळ थांबलोच नसतो, असे सांगत नागरिकांनी गोंधळ घातला. राजनगर केंद्रावर देखील टोकन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे पोलिसांना धाव घ्यावी लागली.

दुसर्‍या डोससाठी आता नोंदणीची गरज नाही : साठा उपलब्ध होत नसल्याने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळाला नसल्याने अनेकजण वेटींगवर आहेत. कोविशिल्ड लसीच्या दुसर्‍या डोससाठी 45 ते 60 दिवसांची मुदत आहे. त्यात दुसर्‍या डोससाठी देखील नोंदणी बंधनकारक केली होती. मात्र आता नोंदणीची गरज नसल्याचे शनिवारी आरोग्य विभागाने स्पष्ट केले.