औरंगाबाद - मुंबई येथून ड्रग्स आणि चरस शहरात आणणार्‍या दोघांना पोलिसांनी मंगळवारी (दि. 29) पहाटे रेल्वेस्टेशन परिसरातून अटक केली. त्यांच्याकडुन 13 ग्रॅम मेफेड्रॉन व 28 ग्रॅम चरससह 5 लाख 99 हजार 200 रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.

आशीक अली मुसा कुरेशी (41, रा. कुर्ला वेस्ट, मुंबई) आणि नुरोद्दीन सय्यद बद्रोद्दिन सय्यद (41, रा. बांद्रा इस्ट, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला. ए. मोटे यांनी बुधवारी (दि. 30) दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथून दोन जण अंमली पदार्थ घेवुन औरंगाबादेत येणार ड्रग्स प्रकरणातील आरोपींना कोठडी असल्याची माहिती पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी रेल्वेस्टेशन परिसरातील पंचवटी हॉटेलजवळ सापला रचून काळ्या रंगाच्या स्कार्पीओ जीपमधुन (क्रं. एमएच-20-एआर-2) आलेल्या आशीक अली आणि नुरोद्दीन सय्यद या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या जीपची झडती घेतली असता, डीक्कत आसीफच्या कपड्यांची बॅग पोलिसांना सापडली. बॅगची तपासणी केली असता चष्मा ठेवण्याच्या पाउचमध्ये चरसच्या 52 हजार रुपये किंमतीच्या 13 पुड्या आणि वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये काळपट रंगाच्या मेफेड्रॉनच्या 11 हजार 200 रुपये किंमतीच्या 9 वड्या सापडल्या. पोलिसांनी अमलीपदार्थांसह रोख रक्कम, आरोपींचे मोबाइल आणि जीप असा सुमारे 5 लाख 99 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला.

याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल रोडे यांच्या तक्रारीवरून दोघांविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यानुसार आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.