औरंगाबाद - घरात हवा खेळती राहण्यासाठी घराचे दरवाजे उघडे ठेवुन गच्चीवर झोपी गेलेल्या कुटूंबाचे घर आणि किराणा दुकान फोडुन चोरट्याने एक लाख 92 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना 2 जून रोजी उघडकीस आली होती. प्रकरणात हर्सुल पोलिसांनी तपास करुन तब्बल तीन महिन्यांनी आरोपीला मंगळवारी (दि. 29) अटक केली. त्याला दोन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. दहातोंडे यांनी बुधवारी (दि. 30) दिले. सागर संजय ढगे (21, रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

हर्सुल परिसरातील गोरक्षनगरात राहणारे सतीष दशरथ घोलप (38) यांनी आपल्या घर व किराणा दुकानाचे आरसीसी बांधकाम केलेल आहे, मात्र त्यांच्या इमारतीचा जिना उघडाच आहे. 1 जून रोजी रात्री घोलप कुटूंबीयांनी घरात खेळती हवा रहावी यासाठी घराचे दरवाजे उघडेठेवुन ते सर्व गच्चीवर झोपण्यासाठी गेले होेते. संधी साधत चोरट्यांनी उघड्या जीन्यातुन प्रवेश करित घरातील 60 हजार रुपये किंमतीची दीडतोळा वजनी बोरमाळ, 15 हजारांची नथ, 45 हजारांचे सेान्याचे झुंबर, 6 हजार 800 रुपयांचे सोन्याचे ओम आणि बाळ्या, 45 हजारांची रोख रक्कम, दुकानाच्या गल्ल्यातील 10 हजार रुपये, नउ हजारांचा मोबाइल, पॅन्टीच्या खीशातील दीड हजार रुपये असा सुमारे एक लाख 92 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दुसर्या दिवशी सकाळी घोलप हे दुकाना उघडण्यासाठी आले असता चोरीची बाब समोर आली. प्रकरणात हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासात आरोपींची चोरीची कबुली
तपास करुन पोलिसांनी आरोपी सागर ढगे याला अटक केली. त्याने शेख इब्राहीम उर्फ इब्बु जमील (21, रा. अबरारकॉलनी, मीसारवाडी) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन चोरीच्या ऐवजापैकी नउ हजार रुपये किंमतीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यात सहाय्यक सरकारी वकील जनार्दन जाधव यांनी न्यायालयाकडे बाजू मांडली.