परळी : येथील राख वाहतूक, अवैध साठे व वाहतुकीमुळे नागरिकांना होणारा त्रास यावरून जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागातील संबंधित सर्व अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेऊन राखेविरुद्ध ’राजदंड’ उगारला होता. त्यानंतर 24 तासांच्या आत स्थानिक प्रशासन अलर्ट झाले असून, मुंडेंच्या निर्देशाप्रमाणे अवैध राख साठे व अवैध राख वाहतुकीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र परिसरातील दाऊतपुर येथे खाजगी जागांमध्ये असलेल्या राख साठ्यांमध्ये राख भिजवून व ताडपत्रीने झाकून ठेवावी, तसेच या राखेची अजिबात वाहतूक करू नये, अन्यथा संबंधित जमीन 
मालकांवर कारवाई करण्याचे आदेश परळी उपविभागीय दंडाधिकारी नम्रता चाटे यांनी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार दाऊतपुर येथील अधिकृत राख तळ्याखेरीज अन्य कुठल्याही ठिकाणावरून राख वाहतूक केली जाणार नाही. तसेच अधिकृत साठ्यातून सर्व नियमांचे पालन करून ट्रान्झिट पास मिळवून नियमानुसार वाहतूक करणार्‍या वाहनांनाच राख वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येईल; याची जबाबदारी औष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी, वाहतूकदार, पोलीस प्रशासन तसेच विभागीय वाहतूक शाखेवर निश्चित करण्यात आली आहे.
तसेच या आदेशाचा भंग करणार्‍यांवर कलम 188, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 तसेच भारतीय दंड संहितेच्या 1860 च्या कलम 269 व 270 नुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल असेही या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसात परळी व परिसरातील नागरिकांना हवेत उडणार्‍या कोरड्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे, याची गांभीर्याने दखल घेत धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला राजदंड दाखवल्यानंतर प्रशासनाकडून तातडीने पाऊले उचलण्यात येत आहेत. या आदेशांमुळे राख वाहतूक मोठ्या प्रमाणात नियंत्रणात येऊन परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने धनंजय मुंडे यांच्या या कारवाईचे परळीकर नागरिकांकडून कौतुक होत आहे.