औरंगाबाद / प्रतिनिधी,


कोरोनामुळे मागील पाच महिन्यांपासून सिद्धार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालय बंद केलेले आहे. अद्यापही ते बंदच आहे. दरम्यान, बच्चे कंपनीसाठी कुतूहल असलेली मिनी ट्रेनही मागील काही दिवसांपासून बंद आहे. तिची दुरूस्ती करण्याचे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी अधिकार्‍यांना दिले. डिझेलऐवजी इलेक्ट्रीक किंवा सोलार एनर्जी पॅनलवर ही ट्रेन चालवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे त्यांनी सूचित केले.
पालिका उद्यानात 17 सप्टेंबर रोजी आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त गुरूवारी दि.10 सकाळी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, उपजिल्हाधिकारी रित मैत्रेवार यांनी सिद्धार्थ उद्यान येथील कार्यक्रम स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून मुक्ती संग्राम दिनानिमित्त आढावा घेतला. यानंतर आयुक्त पांडेय यांनी सिद्धार्थ उद्यानाची पाहणी केली. पाहणी करताना बंद पडलेली मिनी ट्रेन दुरूस्त करून पुन्हा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. डिझेल इंजनऐवजी इलेक्ट्रिक इंजन वापरा आणि शक्यतो इंजनवर सोलार एनर्जी पॅनल लावून सौर ऊर्जेवर ट्रेन चालवावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच मत्सालायाची पाहणी देखील केली आणि तेथे माशांच्या दुर्मिळ प्रजाती ठेवण्याचे निर्देश दिले. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेराबाबत आढावा घेताना प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर कॅमेरे बसविण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रहालयाची पाहणी केली. संग्रहालय चांगल्या पद्धतीने ठेवल्याबद्दल कर्मचार्‍यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी उपाआयुक्त रवींद्र निकम, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, उद्यान अधीक्षक विजय पाटिल व इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.


मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमाचे नियोजन
तिन्ही प्रमुख अधिकार्‍यांनी सुरक्षा, वाहतूक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी प्रक्षेपण किंवा फोटो आणि व्हिडीओ शूटिंगची व्यवस्था, निमंत्रित लोकप्रतिनिधी, स्वतंत्रता सेनानी आणि सामान्य नागरिक यांची उपस्थिती आणि त्यांचे बसण्याचे नियोजन या बाबींचा आढावा घेतला. हा कार्यक्रम यशस्वी आणि सुसूत्रपणे पार पडेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.