औरंगाबाद / प्रतिनिधी,


महापालिकेने शहरातील दुकानदारांना थर्मलगन, ऑक्सिमीटर ठेवण्याची सक्ती केलेली आहे. मात्र दुकानदारांकडून हा नियम पाळला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पालिकेने दुकानदारांकडील थर्मलगन, ऑक्सिमीटरची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गुरूवारी दि.10 नागरी मित्र पथकाने सिटीचौक, जुनाबाजारमध्ये तपासणी सुरु केली. तेव्हा काही दुकानदारांनी दुकाने बंद करुन पलायन केले. सिटीचौकात तर दुकानदारांनी थयथयाट करत पथकाला कारवाईस विरोधही केला.
शहरात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. शहरात कोरोनाचे नियम पाळले जात नसल्यानेच रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरात काही नागरिक विनामास्क फिरत असून सोशल डिस्टसिंगचे पालन करीत नाही, दुकानांवर गर्दी करीत आहे. दुकानदारांकडून ग्राहकांची थर्मलगन, ऑक्सीमिटरव्दारे तपासणी होत नाही. त्यामुळे पालिकेने दुकानदारांकडील थर्मलगन, ऑक्सीमिटरसह मास्क न लावणे, दुकानात गर्दी करणार्‍यांविरुध्द कारवाई सुरु केली आहे. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी दि.9 पालिका मुख्यालयासमोरील हॉटेल, झेरॉक्स दुकानांवर कारवाई केली. गुरुवारी नागरी मित्र पथकाने सिटीचौक, जुनाबाजार भागात दुकानदारांकडील थर्मलगन, ऑक्सीमिटर, सोशल डिस्टसिंग, मास्क न वापरणे याविरुध्द दंडात्मक कारवाई केली. पथकातील कर्मचारी दुकानात जावून कारवाई करीत असल्याचे निदर्शनास येताच या भागातील काही दुकानदारांनी दुकाने बंद करीत पळ काढला. तर काही दुकानदारांनी पथकाच्या कारवाईला विरोध केला.

सिटीचौकात पोलिसांना पाचारण
पालिकेच्या नागरी मित्र पथकाने सिटीचौक, जुनाबाजार परिसरात दंडात्मक कारवाई सुरु करताच दुकानदारांची धांदल उडाली. दुकानदारासह दुकानातील कर्मचार्‍यांचा सिटीचौकात जमाव झाला. या जमावातील तरुणांनी पथकातील कर्मचार्‍यांना घेराव घालून कारवाईच्या विरोधात थयथयाट केला. तेव्हा पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी तातडीने सिटीचौक पोलीसांना कळविले. पोलीसांनी जमावाला हुसकावून लावले. त्यानंतर पथकातील कर्मचार्‍यांनी पैठणगेट भागात जाऊन कारवाई केली.