परळी (जगदिश शिंदे) : तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला तसेच विजयी उमेदवारांनी मोठ्या उत्साहात स्थानिक नेतेमंडळींसह पॅनलप्रमुख व समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. परंतु आता सरपंचपदाच्या सोडतीकडे विजयी उमेदवार सह गावपुढार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार? हे सरपंचपदाच्या सोडती नंतरच समजणार आहे. तत्पुर्वी आपापल्या पॅनलमधून निवडूण आलेल्या सदस्यांना सांभाळण्यांचे मोठे आव्हान आहे. 
परळी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सात पैकी सहा ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे तर भाजपने  परळीतील 4  ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आल्याचा दावा केला आहे. असे असले तरी सरपंचपदाच्या आरक्षणाच्या सोडती नंतरच ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकणार हे स्पष्ट होणार आहे.
परळी तालुक्यात 7 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला होता. 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडल्यानंतर 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल परळी तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन जाहीर झाले.  विजयी उमेदवारांनी आपापल्या गावातील स्थानिक पुढारी व पॅनल प्रमुखांसह विजय जल्लोष साजरा केला परंतु आता या नवनिर्वाचित सदस्यांसह पॅनल प्रमुखांचे संपूर्ण लक्ष सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर केंद्रित झाले आहे. ग्रामपंचायतीमधून सरपंचपदास कोणास राखीव होईल, की खुले राहील, याविषयी कमालीची उत्कंठता निर्माण झाली आहे. कारण काही ठिकाणी गड गेला पण  सिंह आला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच सरपंचपदाच्या आरक्षणावरच संपूर्ण तालुक्यासह गावपुढार्‍यांचे व विजयी ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. मकर संक्रांती सणाच्या तोंडावर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांना धनशक्तीच्या जोरावर निवडणुक लढणार्‍यांकडुन मिळालेल्या लक्ष्मीच्या कृपेने संक्रात चांगलीच गोड झाली तर दि.18 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. काहींना विजयाचा गोडवा मिळाला तर काहींना पराजयाचे कडु अनुभव पदरी पडले.

ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा : परळी व अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती, त्यांपैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. तर परळी तालुक्यातील रेवली व वंजारवाडी या दोन ग्रामपंचायती या अगोदरच बिनविरोध भाजपच्या ताब्यात आल्याने शुक्रवारी उर्वरीत पाच आणि अंबाजोगाई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीसाठी  मतदान होऊन मतमोजणीनंतर परळी तालुक्यातील भोपळा आणि मोहा या ग्रामपंचायती भाजपकडे आल्या. मोहा येथे भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गावं पातळीवर आघाडी स्थापन करण्यात आली होती, त्याला मतदारांनी निर्विवाद कौल दिला. परळीतील चार आणि अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर अशा पाच ग्रामपंचायतीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले. भाजपला  रेवली येथील एका व  लाडझरी येथील दोन जागांवर विजय मिळाला असून सर्व विजयी उमेदवाराचे आभिनंदन भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी केल्याचे भाजपाकडून सांगितले जात आहे.